शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. याबद्दल सुनावणीही सुरू आहे. अशातच ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. हे १६ आमदार अपात्र ठरले, तरीदेखील सरकार पडणार नाही, याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे असे खैरे म्हणाले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खैरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचे काही कारण नाही. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचे काही कारण नाही, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हुशार आहेत.
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल या भीतीने आतापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचे मुख्यमंत्रिपद मिळवून घेतील. कारण मुख्यंमत्रिपद त्यांना मिळाले नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळे असताना त्यांचे डावपेच सुरू असतात, असे चंद्रकांत खैरे म्हणाले होते.