आघाडीचे सरकार कोसल्यानंतर मंथन शिबीर शिर्डीमध्ये होत आहे. तब्येत ठीक नसताना सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हॉस्पिटलमधून शिर्डीकडे रवाना झाले आहे पण, या शिबिराकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला सर्व प्रमुख नेते आणि खासदार हजर आहे. पण, या शिबिरात पक्षाचे फायर ब्रँड नेते खासदार अमोल कोल्हेंची मंथन शिबिराकडे पाठ फिरवली आहे.
हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती विषयावर मांडणी अमोल कोल्हे बोलणार होते. पण अमोल कोल्हे या कार्यक्रमाला गैरहजर आहे. पक्षातील कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज असल्याची सूत्रांची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. कोल्हे यांच्या अनुपस्थिती बाबत पक्षातील नेत्यांनी मात्र मौन बाळगलं आहे.
विशेष म्हणजे, आज शिबिराचा शेवटचा दिवस आहे, पण शेवटच्या दिवशीही कोल्हे आले नाही. याआधीही कोल्हे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, या शिबिरात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भोंगे बंद करण्याचा निर्णय घेताना विचार केला नाही. त्याचा परीणाम काय होणार..? गेले मशिदीवरचे भोंगे बंद करायला आणि साईबाबांच्या मंदिरावरचा भोंगा बंद झाला, असं म्हणत सुळे यांनी मनसेला टोला लगावला.