राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.आता अजित पवारच सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे.अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
हे ही वाचा >>राहुल गांधी स्वत:हून शरद पवार यांच्या भेटीला
मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, “आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला होता. हा मंत्रीमंडळ विस्तार का लांबवला होता? याचं कारण आम्हाला आता कळालं. राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घ्यायचं होतं, त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबवला. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर लगेच त्यांच्या गटाच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. आधी आलेले बिचारे (शिंदे गटाचे आमदार) परिणामाची चिंता न करता आले होते. त्यांचाही शपथविधी घ्यायला पाहिजे होता. ही जी भूमिका आहे, यामुळे काही लोकांना वाटत असेल की आपला पक्ष मोठा होईल, पण यामुळे ते (भाजपा) गोत्यात जाणार, हे मात्र खरं आहे.”