मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना बोहरी समाजाच्या अल्जामिया-तूस-सैफियाह या विद्यासंकुलाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले होते. त्यापाठाेपाठ शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या संकुलाला बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांच्याशीही चर्चा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
येत्या वर्षभरात महापालिका निवडणुका, त्यापाठोपाठ लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकांसाठी सर्व समाजाची मते ही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच गोरेगाव येथे उत्तर भारतीय समाजाची बैठक आयाेजित करीत मार्गदर्शन केले होते. त्यापाठोपाठ बाेहरा मुस्लीम समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शहजादा हुसैन बुऱ्हानुद्दीन साहब व अब्दुलकादीर भाईसाहेब नूरुद्दीन हेदेखील उपस्थित होते
येणाऱ्या काही दिवसात मुंबई महानगर पालिका निवडणुकीपाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत अशातच सर्व समाजातील मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यसाठी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार बरोबर शिवसेना पक्षाने सुद्धा तयारी सुरु केली आहे आजतागायत हिंदुत्ववादी मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाने आता इतर सर्व समुदायाकडे विशेष लक्ष दिले असून निवडणुकीमध्ये त्यांची मते आपल्याकडे खेचण्याचा मानस असल्याचे दिसून येते,