उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भारतीय जनता पार्टी सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं म्हणत आहेत. ही क्लिप ऐकवल्यानंतर “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरला होता. या विधानानंतर संपूर्ण राज्यभरात भाजपा नेते उद्धव ठाकरे विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. या विधानाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे” अशी खोचक टीका केली.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे तुम्ही 2019 साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.