मुंबई | उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गट येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केली. या आंदोलनापूर्वी याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली असून शिवसेनेच्या ट्विटरवरून टीझर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता.
मुंबई महापालिकेतील गैरकारभाराबाबत कॅगच्या अहवालानंतर एसआटी चौकशी सुरु आहे. मात्र सध्या मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून होत आहे. तसेच याच मुद्द्यावरून त्यांनी थेट मुख्यमंत्रो एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुद्धा केली होती. तसेच या उधळपट्टीवर लक्ष वेधण्यासाठी आणि महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे.
ठाकरे गटाने मोर्चासाठी सर्व तयारी सुरु केली आहे. तसेच या मोर्चाचा टीझरही पक्षाने रिलीज केला आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांना परवानगीच नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तर ठाकरे गटाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांच लक्ष लागले असून ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.