गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. यापार्श्वभूमीवर रवींद्र जडेजाने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला. आता गुजरातींनी एक गोष्ट समजून घेण्याची वेळ आली आहे. ‘नरेंद्र मोदींचे सरकार गुजरातमधून गेले, तर गुजरात गेले’ असे बाळासाहेब या भाषणात म्हणाले होते. या व्हिडीओवरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवले आहे. नर्मदा आंदोलनाच्या वेळेस नरेंद्र मोदी एकटेच उपोषणाला बसले होते. त्यावेळेस भाजपचं कोणीही गेले नव्हते . त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की, नरेंद्र मोदी हे उपोषणाला बसले आहेत तुम्ही तिकडे जाऊन या. त्यावेळेस उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, असे खासदार सावंत यांनी म्हटले आहे.त्यावेळेस उद्धव ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. त्यामुळे आता ते किती खोटं बोलत आहेत ते समोर येत आहे. मोदींचा फोटो लावला म्हणून जिंकून आले असे ते म्हणतात. मात्र १९९५ साली कोणाचा फोटो लावून जिंकून आलात, असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सभा घेतल्यामुळे भाजपची सत्ता आली.
भाजप नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे . यावरही सावंत यांनी भाष्य केले . ज्यांनी विषय निर्माण केला त्याच्यावर कारवाई करा. तुम्ही आम्हाला छत्रपतींचा अवमान गिळायला सांगत आहात का? उद्या असंच धाडस आणखी कोणी करेल. आता तुमचा माणूस आहे म्हणून विषय संपवावा आणि इतरांचा माणूस असेल तर तो माणूसच संपवावा हे असे भाजपचे गणित आहे, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.