पुणे |
पुणे मनपाकडून शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यात प्रामुख्याने मंजूर पाण्याचा कोटा, मागील वर्षातील पाण्याच्या स्त्रोत निहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्रनिहाय झोन, समान पाणी पुरवठा प्रकल्प, टाक्या प्रकल्प, पाईपलाईन कामाची प्रगती व नियोजन, मीटर्स बसविण्याच्या कामाची प्रगती व नियोजन आदींची चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली.
समान पाणी पुरवठा योजनेसह पाणीपुरवठ्याची अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आपण स्वतः दर महा महानगरपालिकेकडून आढावा घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांची कामे सप्टेंबर २०२३ पर्यंत तर पाईपलाईनचं काम जून २०२४ पर्यंत अशा निश्चित कालमर्यादेतच पूर्ण करण्याचे निर्देश दिले. समान पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढवून ३३ टक्क्यांपर्यंत होईल, सर्वाना समान पाणी मिळेल. तसंच सोसायट्यांमधील पाणी गळतीची कामं तात्काळ पूर्ण करुन घेण्याच्या आणि बांधकामासाठी, बागांसाठी पिण्याचं शुद्ध पाणी वापरलं जाणार नाही याकडे लक्ष देण्याच्याही सूचना दिल्या.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे जी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, राहूल कुल, दत्तात्रय भरणे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, मनपा आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.