राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला वाढता पाठिंबा शिवसेनेच्या अडचणी वाढवताना दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, शिवसेनेतील गळती काही केल्या थांबताना दिसत नाही.
शिवसेनेसह युवासेनेतीलही पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. असं असतानात आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खोचक टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे सोडून गेले, हाच मोठा गौप्यस्फोट आहे. आता आणखी काय स्फोट करणार आहेत, काय बोलायचं ते बोलू देत, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
तसेच शिवसेनेच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपू दे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा असंही सांगितलं. पेडणेकर यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं आहे. मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचच हे फळ आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. किशोरी पेडणेकर यांच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
“तुमच्या जाण्यानेच मोठा गौप्यस्फोट झाला. यापेक्षा अजून काय स्फोट करणार. भाजपाला जे पाहिजे, ते देण्याची कृपा करू नका. काय बोलायचे ते बोलू देत. मग जनता ठरवेल, स्फोट आहे की आणखी काही आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. यासोबतच “माझी नुकतीच उपनेतेपदी निवड झाली. प्रामाणिकपणे काम केल्याचं फळ आहे. काम करताना निष्ठेने केलं तर फळ मिळतं. सामान्य कुटुंबातील महिलेची असामान्य संघटनेच्या उपनेतेपदी निवड झाली. तुम्ही दाखवलेला हा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाईल” असंही सांगितलं.