आता पुन्हा सावध राहण्याचा काळ
मुंबई : प्रतिनिधी
देशातील आणीबाणी लावल्याच्या घटनेला ५० वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर भाजपा सर्व देशभरात या आणीबाणीला विरोध दर्शवित कॉंग्रेसवर टीका करीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीविरोधात प्रस्तावही मंजूर करण्यात आला. आणीबाणीवरून कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच या मुद्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली असून, पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे, असा टोला सत्ताधारी भाजपला लगावला.
कामगार संघनेच्या एका मेळाव्यात शरद पवार बोलत होते. वृत्तपत्रात काम करतात, त्यांना घोषित-अघोषित आणीबाणीची माहिती असेल. जे वृत्तपत्र त्यांचे मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर ते वृत्तपत्र आणि पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. त्यांना ही बातमी अशी छापू नका. सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल आणि बातमी लावायचीच असेल आणि नंतर काय झाले तर आमच्याकडे येऊ नका, अशी धमकी दिली जाते. त्यामुळे पुन्हा सावध राहण्याची वेळ आलेली आहे, असे शरद पवार म्हणाले.
आता घोषित आणीबाणी आणि अघोषित आणीबाणी यात काय फरक आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आता पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे. पण आम्ही वाट्टेल ती किंमत देऊ. पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टिकोन पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार म्हणाले.