Latest Marathi News

BREAKING NEWS

रेल्वे आली आणि 46 जनावरांचे प्राण घेऊन गेली

करमाडजवळ सटाणा शिवारातील घटना : पाणी पिले अन् रुळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडले :

0

करमाड ( जि . औरंगाबाद ) :

तलावावर पाणी पिऊन चरण्यासाठी मागे फिरलेल्या ४३ मेंढ्या , एक गाय व दोन वासरे अशी ४६ जनावरे रेल्वे रूळ ओलांडताना चेन्नई एक्स्प्रेसखाली चिरडून चेंदामेंदा झाली . या हृदयद्रावक घटनेने हंबरडा फोडणारे मेंढपाळ पोलिसांच्या भीतीने तेथून निघून गेली . ८ मे २०२० रोजी ज्या ठिकाणी मध्य प्रदेशमधील सोळा कामगार मालगाडीखाली चिरडले गेले होते त्या स्थानापासून २०० फुटांवर हा अपघात सोमवारी दुपारी करमाडजवळील सटाणा शिवारात घडला . बनगाव टाकळी ( ता . नांदगाव , जि नाशिक ) येथील सीताराम रामा गोवेकर ( ६६ ) , कौतिक चिंतामण गोवेकर ( २१ अंकुश चिंतामण गोवेकर ( २५ समाधान काशीनाथ मोरे यांची कुटुंबे करमाड परिसरात तीनशे मेंढ्या घेऊन वास्तव्यास आहेत . त्यांच्यासोबत चार महिला , तीन मुली , मुलगा असा १२ जणांचा गोतावळा आहे . मेंढपाळाचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . मेंढ्या चिरडल्याचे दुःख तर सोडाच , परंतु या अपघातामुळे पोलीस आपणास पकडून नेतील गुन्हा दाखल होईल , या भीतीने मेंढपाळाने उरलेल्या मेंढ्यांसह ढग्या डोंगराच्या पायथ्याशी तुळशीराम जगधने यांच्या शेतात आसरा घेतला . सटाण्याचे पोलीस पाटील रफिक शहा यांनी करमाड पोलिसांना घटनेची माहिती कळविली . हवालदार गणेश कांबळे यांनी मेंढपाळांना धीर दिला व घटनास्थळी आणले . पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले , पशुधन विकास अधिकारी डॉ शीला जाधव , मंडळ निरीक्षक रंगनाथ गोरे , पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब बनसोडे , सुनील गोरे , तलाठी मगरे यांनी पंचनामा केला

नेमके काय घडले ?

■ सोमवारी दुपारी ते करमाड शिवारातून रूळ ओलांडून सटाणा शिवारातील पाझर तलावावर मेंढ्यांना घेऊन गेले . पाणी पाजल्यानंतर मेंढ्या पुन्हा उत्तरे कडून रूळ ओलांडून सटाणा शिवारात येत होत्या . त्याच वेळी औरंगाबादहून जालनाकडे जाणारी चेन्नई एक्स्प्रेस धडधडत येत होती .

 एका कळपाने रूळ ओलांडला . रेल्वे ट्रॅकमन प्रभुदास शेजूळ व तेथे उपस्थिताने रेल्वे येत असल्याचे मेंढपाळांना सांगितले ; पण एक कळप पुढे गेल्याने प्रयत्न करूनही मागील मेंढ्या थांबल्या नाहीत . त्यामुळे दुसऱ्या कळपातील ४६ जनावरे चिरडली गेली .

Leave A Reply

Your email address will not be published.