थेट चांदीच्या थाळीतून सदस्यांना मेजवानी, नव्या वादाला तोंड
मुंबई : प्रतिनिधी
अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीची थाळीतून झाल्याचे समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. संसदेच्या अंदाज समितीची महाराष्ट्र विधिमंडळात दोन दिवसांची परिषद होती. मात्र यात आमदार-खासदार आणि अधिकाऱ्यांना पंचपक्वान थेट चांदीच्या थाळीतून वाढण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या चांदीच्या थाळीचे भाडे ५५० रुपये आहे तर त्यामधील पंचपक्वान जवळपास साडेचार हजार रुपयांचे असल्याचेही बोलले जात आहे. म्हणजेच एका थाळीची किंमत पाच हजाराहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण देणे हा तर पेशवाईतील जेवणाचा थाटच असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य २५० आणि अधिकारी ३५० असे एकूण सहाशे अतिथी या परिषदेला होते तर या पूर्वी या परिषदेदरम्यान मराठीत मजकूर न लिहिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता तर महाराष्ट्र अंदाज समितीचा दौरा सुरु असताना धुळे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे अंदाज समिती आणि वाद असे समीकरण झाले की काय? असा प्रश्नदेखील या निमित्ताने विचारला जात आहे.
नशीब सोन्याचा चमचा नाही दिला : राऊत
महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. धुळ्याच्या विश्राम गृहात जी मोठी रक्कम पकडली त्या आधी दहा कोटी रुपये जालन्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे अध्यक्ष यांचे कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे त्यांना चैनबाजीची चटक लागलेली आहे. खरं म्हणजे अंदाज समितीच्या बैठकीला बसायला त्यांना दिलं नाही पाहिजे होतं. त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे. दरम्यान देशभरातून आलेल्या सर्व सदस्यांना सोन्याचा चमचा नाही दिला हे नशीब, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.