मागचयह काही दिवसांपासून विविध मुद्द्यावरून आघाडीमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीत वाद होण्यासारखे विधानावरकेले होते या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याआधी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांना नाना पटोले यांना सुनावलं आहे. महाविकास आघाडीच्या सभेत आपण हा मुद्दा मांडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्या पक्षाशी युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभारविरोधात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहोत, आमची ही लढाई सुरुच राहिल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या या मुद्द्यावर मविआच्या बैठकीत चर्चा करु. काँग्रेस पक्षातून जर कोणी स्थानिक पातळीवर भाजपाशी हातमिळवणी केली तर त्यांच्यावर मात्र पक्ष कारवाई करेल,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
तर अजितदादा म्हणाले की, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्यं करतात. कारण नसताना महाविकास आघाडीत अंतर पडत आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याऐवजी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका हातानेच वाजत नाही. अशा वक्तव्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत,” असं अजित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत मी हा मुद्दा मांडणार आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.