Latest Marathi News

BREAKING NEWS

एमपीएससी” साठी वयोमर्यादा वाढवून द्या! सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

0

“एमपीएससी” साठी वयोमर्यादा वाढवून द्या!

सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई,- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो युवक-युवतींची मोठी कोंडी झाली आहे. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षाही लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे अनेकांची वयोमर्यादा ओलांडली जात आहे. त्याच कारणाने आता राज्य शासनाने या अडचणीचा विचार करुन कोरोनामुळे लांबलेल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्यांना वयोमर्यादा वाढवून द्यावी, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे.

यासंदर्भात त्यांनीही आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत‌ खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी कमी होत असताना राज्य लोकसेवा आयोगाची संधीही विद्यार्थ्यांच्या हातून केवळ वयोमर्यादेच्या अटीमुळे जाऊ नये, असा खा सुळे यांचा मानस आहे. त्याअनुषंगाने कोरोनामुळे वयोमर्यादेची अट जाचक ठरत असल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या या अडचणीकडे गांभीर्याने पाहून राज्य लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेतील वयोमर्यादा अट शिथिल करून परीक्षा घेण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे.महाआघाडी सरकार आता नक्की कोणती भूमिका घेणार याकडे राज्य लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.