चंद्रपूर: काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, असं म्हणत राम मंदिराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टिकेनंतर भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पवार राम मंदिराच्या मुद्यावरून राजकरण करत असल्याची टीका केली आहे. राम मंदिरामुळे कोरोना हटणार नाही हे सर्व जाणतात, देशातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे कोणी याच्यावर बोलण्याची गरज नाही. राज्यातील मंत्र्यांना नवीन गाड्या देऊन, शेतकऱ्यांना कर्जमाफी न देऊन, २० रुपयांचा मास्क महाराष्ट्रात २०० रुपयांना विकला जात आहे, या सर्वांमुळे कोरोना हटणार आहे का ? असा प्रश्न करत मुनगंटीवार यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.
श्री रामाचे मंदिर हा राजकारणाचा नाही तर देशातील नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. मंदिराच्या मुद्यावरून कोणत्याही नेत्याने घाणेरडे राजकारण करू नये. असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला आहे.
नेमक काय म्हणाले होते शरद पवार
नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.