ही आपली लाडकी स्टेफी….
(राजवर्धन जाधव)
कोणत्याही मुलीला शोभेल अशी छान उंची,
लख्खं उजळ रंग,
टोकदार नाक,
चेहेऱ्यावर सदैव मंद हसू,
कितीही गंभीर झाली तरी तिचं ते हसू मावळायचं नाही कधीच !
मस्तपैकी सिंपल पण रीचनेस दाखवणारा टीशर्ट आणि स्कर्ट, टिपिकल ब्लॉण्ड स्टाईलनं पोनीटेल केलेले आणि कपाळावर रूळणारे सोनेरी केस हेयरबँडने बांधून ठेवलेले…
सुंदर मॉडेलचे सगळे लुक्स आणि ॲपिअरन्स अफलातून वेधक…
जोडीला ॲथलेटिक फिटनेस खणखणीत !
खरं सांगतो, ती एखाद्या जेम्स बॉण्ड पिक्चरमध्ये गुप्तहेर सुंदरी म्हणून सहज चालून गेली असती.
टेनिसने रूपवान अशा बऱ्याच स्त्री खेळाडू दिल्यात, अगदी कोर्टवरून उचलून सरळ सरळ फॅशन शो मधे नेऊन ठेवाव्यात अशा !
पण सौंदर्य आणि टेनिसमधलं यश या दोन्हीची सांगड घालायला सगळ्या जणींना जमलं नाही.
ज्यांना जमलं त्यातली एक स्टेफानी ग्राफ !!!
अहो, ही आपली स्टेफी !!!
आपल्यासारख्या करोडोंची धडधड वाढवत वाढवत तिने चक्क बावीस सिंगल्स ग्रँडस्लॅम टायटल्स घेतलीत बरं का म्हाराजा !
जबरदस्त फोरहँड…
तिची रिस्ट्स बघत राहावीत ती फोरहँड मारत असताना…
सॉल्लीड पॉवरस्ट्रोक असायचा तो… प्रतिस्पर्धी खेळाडूच्या झम्मकन् थोबाडीत मारल्यासारखा…
सूम्मकन् जायचा…
एखाद्या कसबी नर्तकीने स्टेजवर लयदार पदलालित्य करुन मोठं कलाशिल्प उभं करावं तसंच स्टेफीचं पदलालित्य कोर्टवर…
भयंकर डायनॕमिक आणि व्हायब्रंट…
जितकं नाजूक तितकंच अग्रेसिव्ह….
जेवढं संमोहीत करणारं तेवढंच चिरडून टाकणारं…
अशा अफलातून आणि अतिचपळ पदलालित्याच्या जोरावर ती फोरहँडसाठी बरोबर गॕप्स तयार करून घ्यायची.
तिचा बॅकहँड स्लाईस तर …नजर हलू द्यायचा नाही देवा !
लोण्यातून अलगद् सुरी फिरवावा तसा…. प्रतिस्पर्धीला कळायच्या आधीच बॉल लाईनमनकडे पोचायचा.
बरं हा बॕकहँड स्लाईस साधा सरळ नसायचा तर त्याच्यात मिसळलेलं असायचं स्टेफीचं संमोहन अस्त्र…फ्लॅट आणि स्पिन ! या असल्या अफाट स्लाईसने समोरची अगदी बेजार होऊन जायची.
“स्टेफी”….
अल्टिमेट रे !
तिनं सेंटर कोर्टवर एन्ट्री घेतली…
खांद्यावरची किट बॕग काढून खाली ठेवली…
अंगावरचा ब्लेझर काढला…
हेअर बँड सोडला…
सोनेरी केस मोकळे सोडले…
परत ते एकत्र केले…
छोटीशी क्लिप लावली पाठीमागे त्या केसांना…
कपाळावर भुरभुरणारे सोनेरी केस,
लांबसडक बोटांनी सावरले
आणि हेअर बँड सेट केला…
ती खुर्चीवर बसली…
मांडीवर विम्बल्डनचा नक्षीदार “W” असलेला टॉवेल…
हातात एनर्जी ड्रींकचा ग्लास…
पाठीत वाकून बसलीय,..
गुडघ्यावर कोपर टेकवून, दोन्ही हातात ग्लास घेऊन, सीप करता करता निळसर डोळे बारीक करुन समोर कोर्टकडं बघतीय ती…
ड्रिंक संपतं…
ती उठते…
रॕकेट काढते बॕगमधून…
आणि…आणि…
ती सम्राज्ञीसारखी कोर्टवर उतरते…
शांतपणे वॉर्म अप करते…
आणि सर्व्हिस करायाला तयार होते….
डाव्या हातात बॉल…
उजव्या हातात रॕकेट…
तिरकी उभी असलेली स्टेफी…
चित्यासारख्या नजरेने एका डोळ्यातून कोर्टचा वेध घेणारी….
बाॕल हवेत उंच उडवते…
उडी मारते…
रॕकेट झप्पकन्न हलते… बॉलला टोलावते….
झप्पकन् समोरचीला काही कळायच्या आत… सूम्म आवाज करत बॉल.स्टेफीला पहिला,पॉईंट मिळवून देतो….फिफ्टीन लव्ह….