Latest Marathi News

BREAKING NEWS

आमच्या स्वर्गीय बापूंचा आज पहिला स्मृतिदिन..

0

*चाळीस वर्षांपूर्वी श्री.भगवंतांच्या मंदिरा समोर नवी चप्पल गायब झाल्या नंतर बापूंनी काय केले..!*

बापू..आमचे बापू..माझे वडिल..त्यांचा आज पहिला स्मृतिदिन..वयाची शंभरी गाठली होती त्यांनी..पण त्यांनीच ठरविलेला ११० वर्षांचा पल्ला मात्र ते दुर्दैवाने गाठू शकले नाहीत..”मी ११० वर्षे जगणार आहे!”,असे आम्हाला ते नेहमी ठणकावून सांगायचे.. आणि खरंच त्याच आत्मविश्वासाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते जगले..सतत काम करीत राहणं..सतत पायी फिरत राहणं,हा बापूंचा स्थायीभाव .. ९६-९७ वयापर्यंत त्यात कधी खंड पडला नाही.. त्यानंतर मात्र घरात घसरुन पडले आणि मणक्याला दुखापत झाली.तिथूनच बापूंचे चालणे-फिरणे बंद झाले. निखळ,निरोगी, मनस्वी, निरागस आणि ठणठणीत आयुष्य बापू जगले!
कोण होते बापू?.. ज्ञानदेव एकनाथ माने..म्हणजे आमचे बापू! तसे माने मूळचे म्हसवडचे.. पण पुढे उदरनिर्वाहासाठी एक पिढी बार्शीत आली. त्यातील एका पिढीतील आमचे बापू..ते लहान असतानाच वडिल स्वर्गवासी झाले. त्यांची आई बाई वारकरी ती सतत देवधर्म आणि वाऱ्या करण्यात मग्न असायची.त्यामुळे बापू संत सावता माळी यांच्या अरण या गावी असलेल्या त्यांच्या मावशींकडेच लहानाचे मोठे झाले.अरण-मोडनिंब परिसरातच ते चवथी पर्यंत शिकले.तिथेच व्यायाम,कुस्त्या,पोहणे आणि मावशीच्या शेतात भरपूर कष्ट करत मोठे झाले.पुढे बार्शीच्या बुरुड गल्लीतील वडिलोपार्जित घरात स्थलांतरित झाले.पोटा-पाण्यासाठी गिरणी कामगार म्हणून लोकमान्य टेक्सटाइल मिल मध्ये कामाला लागले.मग आमची आई अनुसयांशी म्हणजे अक्काशी लग्न.. आम्हा तीन भावंडांचा जन्म.. बापूंच्या जीवनाचे कालचक्र गतिमान झाले.. गिरणी कामगाराच्या जीवनात नैसर्गिकरित्या बहुरंगी छटा ठासून भरल्या जातात.त्याला बापू तरी कसे अपवाद ठरणार?बापूही त्यात रंगून गेले..दारुचे टोकाचे व्यसन आणि कष्टाच्या पैशाची नासाडी.. तरीही त्यात बापूंनी आपले वेगळेपण जतन केले होते.कामावरील प्रचंड निष्ठा,कष्टाळू वृत्ती,हळवा सरळमार्गी पण जिद्दी स्वभाव आणि प्रामाणिकपणा यामुळे ते गिरणीत कामगाराचे जॉबर झाले आणि जॉबरचे मास्तर झाले. गिरणी कामगार विश्वातील हे तसे मानाचे टप्पेच! मला आठवते..त्या काळात गिरणीचे पिल्ले नावाचे सरव्यवस्थापक बापूंच्या प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीवर फिदा असायचे.पण दारुने बापूंच्या संसाराची वाट लागली.पण कुटुंबावर त्यांचा कमालीचा जीव होता..हाल- अपेष्टा आणि व्यसनाधीनतेच्या जाते खालील हा प्रवास सुरु असताना मी अकरावीत असताना आमची आजी बाईचे निधन झाले.बाईवर बापूंचे खूप प्रेम होते.तिच्या निधनामुळे बापूंच्या जीवनात टोकाचे परिवर्तन झाले.. बापूंनी दारु सोडली! ते बुरुड गल्लीच्या लक्ष्मीनारायण मंदिरात दररोज पोथी वाचायला जावू लागले.तिथून पुढे आध्यात्मा बरोबरच त्यांचे इतरही चांगले गूण आम्हाला आनंद देवू लागले. हात-पाय आखडणे सारख्या विकारांवर मंत्राद्वारे मोफत उपचार करु लागले.मंत्र-तंत्रावर आमचा कधीच विश्वास नव्हता.पण बापूंच्या जिद म्हणण्याऐवजी हट्टामुळे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करायचो.पण गंमत म्हणजे बरे झाल़ेले पेशंट बापूंचा सत्कार करायला घरी यायचे.एक यशस्वी गिरणी कामगार, बार्शीच्या एस.टी. स्टँड समोर पेपरचे गठ्ठे घेऊन बसणारा यशस्वी वृत्तपत्र विक्रेता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक निर्मळ मनाचा चांगला माणूस म्हणून आमचे बापू जगले.अक्का आणि बापू हे आमच्या जीवनाचे बलस्थान ! मनाचा निग्रह कसा असतो,हे बापूंकडून शिकावा.. चाळीस वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे…नवी चप्पल घालून बापू बार्शीच्या भगवंत मंदिरात दर्शनासाठी गेले होते.दर्शनाला जाण्यापूर्वी त्यांनी चपला बाहेर सोडल्या.भगवंताचे दर्शन घेऊन ते मंदिराबाहेर आले तर काय बापूंची नवी चप्पल गायब!बापू चिडले..प्रकरण चित्रावर थांबले नाही तर.. बापूंनी अजब निर्णय घेतला..”आज पासून मी नवी चप्पल वापरणार नाही”.. अक्षरशः चाळीस वर्षांपूर्वीचा तो निर्णय त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अंमलात आणली.चक्क आम्हा भावंडांच्या वापरलेल्या चपलाच त्यांनी आयुष्यभर वापरल्या.असे आमचे बापू! आनंद सिनेमातील तो गाजलेला डायलॉग.. जिंदगी ल़ंबी नाही,बडी होनी चाहिये!..पण आमच्या बापूंची जिंदगी ल़ंबीही होती आणि बडीही!.. बापू ,आज तुमच्या आणि अक्काविना आम्ही पोरके झालो आहोत… साधेपणा,निर्मळ मन,निरोगी आणि कणखर शरीर ही तुमची संपत्ती जीवापाड जतन करण्याचे बळ श्री.भगव़ताने द्यावे,हीच प्रार्थना.
*-राजा माने*
*आणि माने परिवार*

Leave A Reply

Your email address will not be published.