भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघात केलाय. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीवर आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. तसंच संजय राऊत महाविकास आघाडीतील शकुनीमामा असल्याचंही नितेश राणे म्हणालेत.
सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची सभा झाली. त्याचे फोटो व्हायरल झालेत. बाळासाहेब ठाकरेंचा एक वेगळा रुबाब होता. मोठ्यातला मोठा नेता, कलाकार मातोश्रीवर यायचा. बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करायचा आणि मगच मुंबईत यायचा. पण काल उद्धव ठाकरेंना काल सिल्हर ओकवर जी वागणूक मिळाली त्यावर त्यांनी विचार करावा. भाजपा सोबत असताना उद्धव ठाकरेंना जो मान होता. तो काल दिसला नाही, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांच्या नादी लागल्याने तुमची अवस्था काय झाली बघा. सोफ्यावरून तुम्ही स्टूलवर याल अशी आम्हाला भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंजवळ नेता उरला नाही कामगार न्यावा लागतो. ही उरलेल्या उद्धव सेनेची अवस्था आहे, असं नितेश राणे म्हणालेत.