नवी दिल्ली :कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सुरुवातीलाच राजीनामा सादर केला आणि नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी सांगितले. पार्टी महासचिव केसी वेणुगोपाल यांना सविस्तर उत्तर पाठवले असल्याचे म्हटले. परंतु यानंतर माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना अध्यक्ष पदावरच राहण्याचा आग्रह केला. परंतु सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद आणि पत्र लिहिणाऱ्या इतर नेत्यांनी अधोरेखित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. जेंव्हा पार्टी राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील विरोधी शक्तींशी लढत होती, यावेळी सोनिया गांधी अस्वस्थ असताना अशा प्रकारचे पत्र का लिहिले गेले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
मात्र पत्राची बातमी प्रसारित होताच, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी, तसेच युवा नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधी या दोघांच्याही नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. गांधी घराण्यातील अध्यक्ष नसल्यास पक्षात सुसूत्रता राहणार नाही असे मत व्यक्त केले.
दरम्यान कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सात तास चाललेल्या बैठकीत, सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष राहतील, येत्या सहा महिन्यात नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल. असे ठरवण्यात आले आहे.