Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेना नेते अनिल परब यांची अडचण वाढणार? साई रिसॉर्ट प्रकरणी गुन्हा दाखल

0

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी परिवहण मंत्री अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

किरीट सोमय्यांनी या रिसॉर्टचे पाडकाम करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला होता. या रिसॉर्टचे पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधीच अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अॅड. अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानुसार एकहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आदी आरोप परब आणि इतरांविरोधात आहे.

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आले नव्हते. त्यानंतर सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.