Latest Marathi News

BREAKING NEWS

गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट

0

मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना हीन पातळी गाठली आहे आणि अब्दुल सत्तार यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिव्या देण्यापर्यंत मजल गेली आहे. या दोन्ही वाचाळवीरांविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून शिवसैनिक आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरत गुलाबराव पाटील यांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोडे हाणले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट सत्तार यांच्या मुंबई आणि संभाजीनगरातील घरावर हल्लाबोल केला आहे. सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यावर दगडफेक करण्यात आली असून पोलिसांकडून हे आंदोलन चिरडण्यासाठी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. दरम्यान, खोके घेऊन सत्तेत बसलेले बोके माजले असून त्यांचा माज उतरवावाच लागेल, असा इशारा शिवसैनिकांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

महाप्रबोधन यात्रेवर निघालेल्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज गुलाबराव यांच्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र निदर्शने केली. गुलाबराव पाटील यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्या फोटोला जोडे मारण्यात आले.

शिवसेना भवन येथे शेकडो रणरागिणी रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी ‘गद्दार गुलाबराव पाटीलचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत व मीना कांबळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शिवसेना विभाग क्र. 1, 2, 3 च्या वतीने पश्चिम उपनगरात आंदोलन करण्यात आले. आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू, विलास पोतनीस आणि सुधाकर सुर्वे यांनी यावेळी बोलताना गद्दार गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Leave A Reply

Your email address will not be published.