मुंबई महापालिकेचा रणसंग्राम सुरु होण्याआधी महाराष्ट्र अन् मुंबईत प्रचंड राजकीय उलथापालथी सुरु आहेत. त्यातच सणासुदीत उत्सवाचा मुलामा देत काही राजकीय समीकरणंही बदलू पाहत आहेत. आज मुंबईतील शिवाजी पार्कवरचा कार्यक्रमही याच खेळींचा भाग आहे का, हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होईल. राजकीय वर्तुळाचं या कार्यक्रमाकडे जातीनं लक्ष आहे, कारण इथे प्रथमच एकनाथ शिंदे (, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहेत.
मनसेच्या वतीने दीपोत्सवाची जंगी तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये भले मोठे कंदील लावण्यात आले आहेत. झुंबर आणि इतर लायटिंगदेखील लक्षवेधी ठरतेय. शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी चार वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस आहे. आजपासून मनसेच्या दीपोत्सवाची सुरुवात होणार आहे. या उत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आलंय.अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला सहानुभूती दर्शवण्यासाठी राज ठाकरे यांनी शिष्टाई केली. त्यानंतर भाजपने आपल्या उमेदवाराची माघार घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेत राज ठाकरे भाजपाला साथ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मनसेच्या नेत्यांकडून वारंवार येणारी वक्तव्यदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणारी असतात तर सध्याच्या सरकारकडे विनंती करणारी असतात. त्यामुळे शिंदे गट आणि विशेषतः भाजपच्या बाबतीत राज ठाकरेंचा सूर मवाळ होत असल्याचे दिसून येत आहे.