Latest Marathi News

BREAKING NEWS

पुन्हा शिवसेना फुट पॅटर्नची पुनरावृत्ती होणार ! साहेब विरुद्ध दादा संघर्ष वाढणार !

0

राष्ट्रवादीवर दोघांचा ही दावा !
शिंदे–फडणवीस पाठिंब्यासहित सत्तेला सतरा आमदारांनी झिडकारले !
सतरा जण साहेबांच्या गोटात !
दादांच्या मागचा तेहतीसचा आमदारांचा आकडा वाढणार का ?

बार्शी (सचिन अपसिंगकर) – दिनांक 02 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे प्रबळ नेते अजित पवार यांनी इतर आठ आमदारांना बरोबर घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे नवे राजकीयपर्व, संघर्षपर्व सुरू झाले. राष्ट्रवादी अंतर्गत शरद पवार विरुद्ध अजित पवार या काका पुतण्यांचा संघर्ष इतका शिगेला पोहोचला की शह-काट-शह देण्यासाठी लगेच कागदी कायदेशीर घोडे नाचविण्यास सुरुवात झाली. तीस जून रोजी शुक्रवारी आपण विधानसभेच्या विरोधीपक्ष पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला असल्याचे सांगितले. लगोलग दुसर्यागच दिवशी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांची उचलबांगडी करत ते पद खासदार सुनील तटकरे यांना सोपविल्याचे अजित दादांनी जाहीर केले. इकडे शरद पवार गटाने प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पाच जुलै पर्यंत पक्षात परत येण्याचा सल्ला कथित बंडखोर आमदारांना दिला. दोन दिवसात राज्यात प्रत्येक जिल्ह्यात साहेब विरुद्ध दादा गटाच्या म्होरक्यांनी आपल्या निष्ठेचे प्रदर्शन केले. आज पाच जुलै रोजी मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या साहेब व दादा गटाच्या बैठका गाजल्या. या बैठकांना मेळाव्याचे स्वरूप आले. सर्वांनीच एकमेकांचे वाभाडे काढले. अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे असे म्हणत साहेबांनी अगोदरच रणशिंग फुंकले होते.

आजच्या राष्ट्रवादीच्या दोन गटातील मेळाव्यांना शक्तिप्रदर्शनाचेच स्वरूप आले. राष्ट्रवादी अंतर्गत पडलेल्या या मोठ्या फुटीमुळे राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांची मोठी कोंडी झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी अनेकवर्ष एकदिलाने राष्ट्रवादीचे राजकारण एकमुखाने सांभाळले असल्यामुळे राज्यातील अनेक आमदारांचे हे दोन्ही नेते एकमुखाने गॉडफादर आहेत. या दोघांमध्ये सुप्ततनाव आणि शीतयुद्ध सुमारे दशकभरापासून सुरू असले तरी पक्षात पवार साहेबांचा शब्द प्रमाण आणि अंतिम मानला जायचा, तर पक्षाचे दैनंदिन कामकाज आणि मंत्रालय प्रशासन यावर प्रत्यक्ष उपमुख्यमंत्रीपद व महत्वाचे मंत्रिपद भूषविणार्याद अजितदादांची पकड होती. त्यामुळे आज राष्ट्रवादीमध्ये साहेब विरुद्ध दादा असा थेट सामना सुरू झाल्यामुळे अनेक आमदारांची मोठी पंचायत झाली आहे.

राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी आपल्याला मानणार्यान आमदारांचा मोठा गट निर्माण केलेला असला तरी शरद पवारांचे राष्ट्रीय राजकारणातले स्थान व प्रभावी नेतृत्व गुणांमुळे त्यांनाही डावलणे सोपे नाही मात्र अशाही परिस्थितिमध्ये अजितदादांनी भाजपाचे केंद्रशासन आणि राज्यशासनातला मोठा सहभाग या बलस्थानांवर छगन भूजबळ सारख्या जुन्या साहेबनिष्ठ व दिलीप वळसे-पाटील सारख्या विश्वासू सहकार्याबला आपलेसे करत आपल्या बरोबर येण्यास भाग पाडले. हे त्यांच्या राजकीय कौशल्याचे मोठे यश आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हे त्यांच्याच बरोबर जाणार हे उघड होते, तरीही सत्तेतल्या सहभागाच्या मोठ्या वाट्याचे ध्येय डोळ्यासमोर असतानाही व सत्तेचे फायदे गृहीत धरूनही आज अजितदादा गटातील आमदारांचे संख्याबळ बत्तीसपेक्षा वाढू शकलेले नाही. त्यामुळे अजितदादांचा मेळावा यशस्वी झाला असला तरी आगामी काही दिवसांमध्ये कोणत्या घडामोडी होतील आणि संख्याबळाच्या चाचणीमध्ये नेमके किती आमदार कोणाच्या पाठीशी राहतील हे सांगणे अवघड आहे. आजच्या बैठकीत अजितदादांचे भाषण अतिशय विचारपूर्वक होते. दादांनी आपल्या वाटचालीत आपण साहेबांना कशा प्रकारे साथ दिली हे सांगत असताना अगदी सुरुवातीलाच त्यांच्या जडण-घडनीमध्ये असलेले साहेबांचे योगदान नि:शंकपणे मान्य केले. शरद पवारांची समाजवादी कॉंग्रेसपासून ते पुलोदच्या स्थापनेपर्यंत, आणि राष्ट्रीय कॉंग्रेस मधील प्रवेशापासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्मिती पर्यंतच्या टप्प्यांवर दादांनी भाष्य केले. दादांनी अप्रत्यक्षपणे साहेब तुम्ही जे केले तेच आता मी केले असे थोडक्यात सांगितले. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी होण्याची साहेबांची तयारी होती व त्यांनी चारवेळा या प्रस्तावाला संमती दिली होती असे दादा म्हणाले. त्याचप्रमाणे भाजपा जातीयवादी पक्ष असल्यामुळे चालत नसेल तर मग शिवसेना कशी चालली ? असा ही सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्यामुळे व ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद हा फॉर्म्युला ठरलेला असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारले व त्यामुळे दीडदशके राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदापासून दूर रहावे लागले असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे दादांनी राष्ट्रवादीच्या राजकीय यशाचा निर्देशांक गेल्या दोन दशकात घसरल्याचे सांगत राज्यात राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या न-वाढता कमी होत गेल्याचे सांगितले. तसेच पहाटेच्या शपथविधीचे ही बिंग त्यांनी फोडले. त्याचप्रमाणे तुम्ही आता थांबणार तरी कधी ? तुम्ही बसून मार्गदर्शन करा, असे आपले म्हणणे होते व त्याकडे साहेबांनी दुर्लक्ष केले. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागेच घ्यायचा होता तर मग राजीनामा दिलाच कशाला ? असाही सवाल त्यांनी केला. अजितदादांच्या भाषणात साहेबांवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर टीकेचे अनेक मुद्दे होते. या भाषणाचे खंडन करताना पवारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचे जाहीरपणे समर्थन केले होते, तसेच कॉंग्रेसच्या विरोधात कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय ही त्यावेळी घेतला होता. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेसला विचारांवर आधारित पाठिंबा दिला होता. शिवसेनेला जातीयवादी संबोधता येणार नाही आणि त्यांचा हिंदुत्ववाद हा आठरापगड जातींना सामावून घेणारा आहे. मात्र भाजपाचा हिंदुत्ववाद हा विघटनवादी, विषमतावादी, मनुवादी आहे असे म्हणत पवार यांनी अजितदादांनी भाजपाबरोबर जाण्याच्या भूमिकेवर टीका केली, तसेच माझ्या फोटोवर तुमचे नाणे चालवू नका, असे ही ते म्हणाले. या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी ही आक्रमक पवित्रा घेत आता संघर्ष सुरू झाला असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वावर निष्ठाव्यक्त करण्याची शपथ घेण्यास सांगितले. दरम्यान राष्ट्रपती मूर्मू यांचा विदर्भदौरा सुरू आहे. मात्र या दौर्या्तील नियोजित कार्यक्रम रद्दकरून मुख्यमंत्री शिंदे तडकाफडकी मुंबईला परतले.

अजित पवार यांच्या सत्तासहभागामुळे शिवसेनेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, अशी चर्चा होते, मात्र शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या असंतोषाला थेट तोंड फोडले. सत्तेमध्ये सहभाग मिळत नसेल तर सत्ता काय कामाची ? असा सवालच त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अजितदादांची सरकारमध्ये एंट्री ही शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढविणारी ठरते आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या अधिकृतपणा बाबतचा निर्णय अंमलात येईल व मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सोळा आमदार अपात्र ठरतील, आणि या पेचप्रसंगामुळे उदभवलेल्या परिस्तिथीमध्ये कदाचित अजितदादांकडे मुख्यमंत्रीपद सोपविले जाईल अशीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान शिवसेनेने शिंदे गट अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपा हे सरकारमधील घटकपक्ष झाल्यामुळे राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात नवे राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. अलीकडे पक्षीय राजकारणाला फाटा देऊन स्थानिक पातळीवर व्यक्तिनिष्ठ राजकारण रुजविण्याचा प्रवाह बळावला असला तरी राज्यातील या नव्या सत्तासमीकरणामुळे अनेक राजकीय फॉर्म्युले आणि त्रांगडे सुद्धा उदभवतील हे नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.