Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे? ही दोन नावे चर्चेत

0

मुंबई | राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटाने केंद्रात दोन मंत्रिपदे मिळावी, अशी मागणी भाजप सरकारला केल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार शिंदे गटाकडून केवळ दोन केंद्रीय मंत्रिपदेच नाही तर राज्यपालपदांची मागणीदेखील करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी केल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे अमित शहा हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागणीवर आजच अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या गजानन कीर्तिकरांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि गजानन कीर्तिकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही नेत्यांना संधी मिळते का, हे पाहावे लागेल.

ठाकरे गटाचे गजानन कीर्तिकर नुकतेच शिंदे गटात गेले आहेत. केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या इच्छेपोटीच कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीबाबत काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकही पार पडली होती. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याकडे पाहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.