केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विचार पुष्पामध्ये कोणाचेही आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. अमित शहा यांच्या जीवनावरील आचार्य पवन त्रिपाठी लिखित पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते आता फडणवीसांच्या या विधानामुळे विरोधकांना टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, अमित शहा हे पक्षासाठी समर्पित नेतृत्व आहे. भाजप अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य आपण पाहिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यूपीमध्ये त्यांचे कार्य आपण सर्वांनी पाहिले, जिथे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कार्याला जाते.
अमित भाई एका दिवसात ४०-४०बैठका घेऊन कार्यकर्त्यांपासून समाजातील प्रत्येक घटक आणि व्यक्तीपर्यंत पोहोचले. पक्षमजबूत करण्यासाठी ते जवळपास देशभर फिरले. प्रत्येक राज्यात त्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. तसेच दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहून त्यांनी या कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया हाताळली आणि भाजपचे सरकार आले. घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.