रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केलं. यानंतर अजित पवार गटातील नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा निषेध करणारं ट्वीट केलं. मात्र, त्या या ट्वीटमुळे ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं. यूजर्सनी रुपाली चाकणकरांना फक्त निषेध काय करताय असं म्हणत अजित पवार गटात गेल्यामुळे नेटकरी संतापले आहे.
एका युजरने रुपाली चाकणकरांच्या ट्वीटवर त्यांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष म्हणून कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्य एका युजरने “अवस बाई इकडे, पुनव बाई तिकडे”, अशी यांची अवस्था असल्याची टीका केली. एका युजरने तर चाकणकर यांनी एकाचवेळी महिला आयोग अध्यक्षपदी आणि पक्षाच्या पदावर राहण्यावर आक्षेप घेतला. तसेच त्यांनी आयोगाचं पद सोडावं, नाहीतर पक्षाचं पद सोडावं, अशी मागणी केली.
एका युजरने म्हटलं, “कशाला देखलेपणा करता. सगळे भ्रष्ट एका ठिकाणी जमा झाले आहेत. त्यामुळे आता नांदा सौख्य भरे. उगाच साळसूदपणाचा आव कशाला. सगळ्यांना सगळ्यातलं सगळं समजतं.” “रूपाली ताई तुमच्या आवाजात एवढी मधुरता कशी काय आली?” असा सवाल करत एका युजरने रुपाली चाकणकरांचा भूमिका घेण्यातील सूर बदलला असून आक्रमकता कमी झाल्याचं म्हटलं.