Latest Marathi News

BREAKING NEWS

“भरत गोगावलेंविरुद्ध रूपाली चाकणकर आक्रमक…!”

0

मुंबई |

सध्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. मी आदिती तटकरेंपेक्षा चांगले काम करू शकतो. महिला व पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे, असं वादग्रस्त विधान भरत गोगावले यांनी केलं.

भरत गोगावलेंच्या या विधानावरुन अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी निषेध नोंदवला आहे. आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, भरत गोगावले ,आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी.आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.