राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तर या निर्याणानंतर अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.शरद पवार याच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, काल दिवसभर राजीनामा मागे घेण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू होती.
शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राजीनामा मागे घेण्याची मागणी या वयातही पवार साहेब युवकांना लाजवेल असं काम करतात. पुढील दोन दिवसांत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपजिल्हाध्यक्ष रवींद्र तांगडे यांनी दिला आहे.
राजकारण करत असताना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही संकल्पना पवार साहेब यांनी शिकवली. त्यांच्याकडून अजूनही बरंच काही शिकणे बाकी आहे, त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा असं आम्हाला वाटतं. तरी त्यांनी आपला निर्णय त्वरित बदलावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा रवींद्र तांगडे यांच्यावतीनं देण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.