नाशिक| लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचा एका पक्षाला सोडचिट्टी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाच आता भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजपसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. प्रामुख्याने यात भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांचा समावेश होता. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर पाटील हे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे स्पष्टीकरण हिरे कुटुंबाकडून देण्यात आले आहे.
सीमा महेश हिरे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर नाशिक पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई, नवीन नाशिक येथील युवा कार्यकर्ते सुमित सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे नाना पटोल यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.