एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शन पवार हिच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला. आरोपीच्या हातात कोयता पाहताच तरुणीने प्राण वाचवण्यासाठी पळ काढला. आरोपी तरुणीच्या मागे कोयता घेऊन पळत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याने तरुणीवर हल्ला केला. पण त्याचवेळी तिथून जाणारे पुणेकर मदतीला धावले. त्यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत त्या दोन्ही धाडसी तरुणांचे कौतुक केले आहे तसेच हा प्रकार घडताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या नागरिकांना चांगलाच टोला लगावला.
काय म्हणतायत राज ठाकरे
काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.
दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी.
आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.
दरम्यान लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांनी कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवलं. त्यांनी आपला प्राण धोक्यात घातला. या दोन्ही तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ५१ हजार रुपयांच बक्षीस जाहीर केलं आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. हे दोन्ही तरुण पुण्यात एमपीएससी तयारी करत आहेत.