राज्यात तसेच देशातील अनेक भागात होत असलेल्या दोन समाजाच्या वादावादीवर (दंगली) उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट भारतीय जनता पार्टीवर आरोप केले आहेत. जिथे सत्ता जाते किंवा सत्ता आणायची असते तिथे दंगली घडवतात, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. आदित्य ठाकरे मंगळवारी त्यांच्या मतदारसंघांमध्ये म्हणजेच वरळीमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते.
भाजपचे समीकरण आहे जिथे सत्ता जाते किंवा सत्ता आणायची असते तिथे दंगली घडवतात. अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, एकही दंगल घडली नाही, याची आठवणही आदित्य ठाकरे यांनी करुन दिली.
पुढे कर्नाटक निवडणुकीवरून भाजपाला टोला लावताना म्हणाले की, देशातील जी तीन त्यांनी राज्य ढापली त्याचं नेमकं काय होणार हे कर्नाटकाच्या निवडणुकातून स्पष्ट झालं आहे. ज्यांनी कर्नाटकात गद्दारी केली त्यातील 17 जणांपैकी 16 उमेदवार पराभूत झाले. इतर 30 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले की गद्दारी चालणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
आता कर्नाटकप्रमाणे गद्दारी करून ढापलेले महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे देखील असाच निकाल लागणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार. आपण लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हणतो. कर्नाटकच्या निकालामधून असं दिसतंय की आगामी महानगरपालिका निवडणुका या २०२४ मध्ये होतील. निवडणुका लागत नाहीयेत, असं चालल तर कसं होईल? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केली.