राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीवरील फुटीचं मळभ दूर झाल्याची चर्चा होती. मात्र, ही चर्चा असतानाच आता एका जाहिरातीमुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत चक्क अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहिरात छापण्यात आली आहे. ही जाहिरात पानभर आहे. या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. सोबत शरद पवार यांचाही फोटो आहे. विशेष म्हणजे या फोटोत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचाही फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. फडणवीस यांचा फोटोही छोटा छापण्यात आला आहे. मात्र, अजितदादांचा मोठा फोटो छापण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.