मुंबई | खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 1200 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 17 तास झाडाझडती केल्यानंतर ईडीनं राऊतांवर कारवाई केली. ईडीनं रात्री उशिरा राऊतांवर ही कारवाई केली आहे.
काल (रविवारी) सकाळपासून राऊतांची चौकशी सुरू होती. राऊतांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचं पथक आलं होतं. अधिकाऱ्यांची तीन पथकं त्यांच्या विरोधात तपास करत होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. संजय राऊतांना अटक होताच संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.
सुनील राऊत यांनी आरोप केली की, खोटी केस तयार करून राऊतांना अटक करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही, एक टक्काही नाही, संजय राऊत यांना कागदपत्र वाचून दाखवण्यात आली. यात पत्राचाळीचा उल्लेख कुठेही नाही असंही ते म्हणालेत. 50 लाखांच्या एन्ट्री आणि काहीतरी बोगस केस फाईल बनवून अटक केली असल्याचंही सुनील राऊतांनी सांगितलं. ही खोटी केस दाखवली असून लवकरच संजय राऊत बाहेर येतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असंही सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.