Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवारांच्या मुलाखतीतून संजय राऊत काय बाहेर काढणार?

0

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये कुरबुर आहे. असे चित्र कायम निर्माण केले जाते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी तर ” हे सरकार यांच्या कर्माने कोसळेल, आम्ही प्रयत्न करण्याची गरज नाही” असे सुचवले होते. संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून यात अनेक राजकीय घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

खा. संजय राऊत हे सरकार स्थापन होण्याआधी पासून भाजपा वरती तोफ डागत आलेले आहेत. ‘सरकार टिकणार नाही’ , अशाप्रकारच्या बातम्या आल्यानंतर संजय राऊत, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामाना’चा अग्रलेख असू, राज्यपालांना कोपऱ्यापासून नमस्कार केल्यानंतरचे पत्रकारांसोबतचे संभाषण असू, किंवा आपल्या सोशल मीडियामधील पोस्ट किंवा कधी उपरोधात्मक शायरी किंवा तत्सम पोस्ट असू, संजय राऊत सतत विरोधकांना तुम्ही काहीही केले तरी सरकारला तुसभार देखील धक्का लागणार नाही, असे कायम सांगत आलेले आहेत.

संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकार स्थापनेत मोठा वाटा आहे, त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी कधीही लपवले नाही. किंबहुना राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत असे सांगितले देखील होते की शरद पवार आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीबाबत चर्चा पुढे गेली.

संजय राऊत हे महाविकास आघाडी बनण्याचा धागा होते, असं म्हणलं तरी वावगे ठरणार नाही. २०११ साली भारताने विश्वचषक जिंकला होता त्या फायनल मॅचच्या पार्श्वभूमीवर या सरकारचे आकलन करायचे झाल्यास, महेंद्रसिंह धोनीच्या भूमिकेत शरद पवार आणि गौतम गंभीरच्या भूमिकेत संजय राऊत दिसतील. थोडक्यात महाविकास आघाडी मॅचचे सामनावीर संजय राऊत तर मालिकावीर हे शरद पवार आहेत, असे चित्र आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांची प्रखर मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असे सांगितले आहे की ” देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल.

लवकरच सामनात प्रसिद्ध होईल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. शरद पवारजी, चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले ” असा खुलासा त्यांनी केला आहे.

बदल्यांवरून महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी होत असल्याचे वृत्त आले असताना ही मुलाखत महत्वाची ठरणार आहे. या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रीड बिटवीन द लाईन म्हणतात तसे राऊत यातून काय सुचवू पाहतात हे सविस्तर मुलाखत आल्यावरच समजेल.

Leave A Reply

Your email address will not be published.