छत्रपती संभाजीनगरमधील राम मंदिर परिसरात रामनवमीची तयारी सुरू असताना अज्ञात तरुणांच्या गटाने रामनवमीची तयारीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर या वादानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. दंगली माजवणाऱ्यांनी पोलिसांच्या आणि खासगी मिळून १३ गाड्या जाळल्या. दगडफेकीमध्ये काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत १२ गोळ्या झाडल्या.
अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रात्री ३.३० वाजेपर्यंत तापलेले हे प्रकरण शांत करण्यात आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना वेळ लागला मात्र या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकावर टीकास्र सोडले आहे. या घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
पुढे राऊत म्हणाले की, राज्यात अशांतता निर्माण करणे, हा या सरकारचा एकमेव उद्देश आहे. आज दंगली होताना दिसत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्थित्वात आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त परिस्थितीत गृहमंत्रालयाचे काम करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने दिसून येते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे या सरकारचे अपयश आहे. राज्यात असे तणावाचे वातावरण निर्माण व्हावे, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.