मुंबई : कोरोनाच्या रूपात आलेल्या वैश्विक महामारीने अमेरिका आणि चीनच्या आधीच खराब असलेल्या संबंधांना आणखी खराब करायचे काम केले आहे. वुहानमध्ये जेंव्हा या आजाराची सुरुवात झाली. तेंव्हा चीनने जगापासून अनेक गोष्टी लपवल्या, शिवाय आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु ठेऊन संपूर्ण जगाला कोरोनाच्या दरीत लोटले. असा आरोपही अमेरिका वारंवार लावत आहे. वुहानच्या ज्या टेस्टिंग लॅबमधून हा व्हायरस पसरल्याचे सांगितले जाते. त्या लॅबच्या सखोल चौकशीची मागणी देखील अमेरिकेने केली होती. अमेरिकेच्या या चिडचिडीचे सर्वात महत्वाचे कारण हेच की कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव हा अमेरिकेतच आहे.
अमेरिकेने चिनी दूतावास बंद केले
अमेरिकेच्या ह्युस्टन शहरातील वाणिज्य दूतावासावर अमेरिकेने रीतसर बंदी घातली. शनिवारी आदेशानुसार अमेरिकेतील एजंट्सनी चार दशकं तिथे असणाऱ्या चिनी दूतावासावर बंदी घातली. त्यामुळे या दोन देशांतील संबंधाची दरी आणखीच वाढली आहे. चीनने देखील विलंब न करता अंतर्गत विषयांमध्ये दखल देण्याचे सांगून, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का लावण्याचे कारण पुढे केले आणि चीनच्या चेंगदू शहरात असणाऱ्या, अमेरिकेच्या माहावाणिज्य दूतावासावर बंदी घातली.
अमेरिका – चीन तणावाची काही इतर कारणे
चीन अमेरिका ट्रेड वॉर
अमेरिका चीन यांच्या दरम्यान ६ जुलै २०१८ पासूनच ट्रेड वॉरला सुरुवात झाली होती. चीनकडून आयात होणाऱ्या ३४ बिलियन डॉलरच्या आयातीवर अमेरिकेने २५% टॅरिफ लावला होता. यानंतर दोघांनी एकमेकांवर टॅरिफ वर चढवून लावायला सुरुवात केली होती. याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१९ ला दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला. या कराराला फेज वन ट्रेड डील असे संबोधले गेले. १५ जानेवारी २०२० रोजी दोन्ही देशांनी यावर स्वाक्षरी केली. अशातच कोरोनाच्या महामारीने जन्म घेतल्याने दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडले, अमेरिकी व्यापाऱ्यांनी हात आखडते घेतले.
हॉंगकॉंगचा नवा कायदा
चीनने हॉंकॉंगमध्ये नवा सुरक्षा कायदा लागू केला आहे. याचा मूळ उद्देश म्हणजे लोकशाहीच्या बाजूने उठणारा आवाज दाबणे हाच आहे. जे लोक इथे बाहेरून स्थायिक झाले आहेत त्यांच्यावर या कायद्याचा थेट परिणाम होणार आहे. या कायद्यानुसार हे लोक यापुढे हॉंगकॉंग निवासी राहणार नाहीत. अमेरिकेने याचा बदला म्हणून एक आदेश काढला ज्यानुसार चिनी लोक आणि संस्था यांच्यावर प्रतिबंध येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कायद्यावर सही केल्यानंतर असे सांगितले होते की, ” मी केलेली स्वाक्षरी हॉंगकॉंग मधील लोकांची गळचेपी दाखवून देते”
दक्षिण चीन सागरात चीनची वाढलेली लुडबुड
दक्षिण चीन सागरात चीनची वाढलेली लुडबुड यावरून देखील अमेरिकेचा चीन वर डोळा आहेच. याबरोबर ताईवान प्रांतावर चीनने दावा सांगितल्याने देखील अमेरिका चीनवर नाराज झाली आहे. याच कारणांचा परिणाम म्हणजे अमेरिकेने ह्युस्टन मधील चिनी दूतावासावर बंदी घातली आहे.