कधीकाळी राष्ट्रवादीचे खासदार राहिलेले आणि पवारांचे खांदे समर्थक खासदार उदयनराजे भोसले हे भाजपात गेल्यापासून पवार कुटुंबियांवर टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये. अशातच आता रयत शिक्षण संस्थेवर शरद पवारांची असलेली मक्तेदारीआणि अध्यक्ष पदावरून उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या योगदानात ज्यांचे काडीचेही काम नाही असे रयत कौन्सिलचे सदस्य बनत आहेत. राजघराण्याने कर्मवीर भाऊराव पाटील यांना उदात्त हेतूने शिक्षणाच्या कामाकरता साताऱ्यात जागा दिली. मात्र, सध्याची स्थिती पाहता अण्णांच्या मूळ हेतूला बाधा पोहोचत आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर कायमस्वरूपी सेवेत घेण्याकरता काही शिक्षकांनी बेमुदत उपोषण छेडले आहे. या उपोषणासंदर्भात पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये अनौपचारिकरित्या छेडले असता खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आमच्या आजी सुमित्राराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेला साताऱ्यात जागा दिली.
मात्र, सध्या रयतमध्ये ज्यांचे रयतच्या उभारणीमध्ये काडी मात्र योगदान नाही त्यांची भरती सुरू आहे. त्यामुळे कर्मवीर अण्णांच्या मूळ हेतूलाच बाधा पोहोचत आहे.’ ज्यांचे योगदान शून्य आहे त्यांनाही तुम्ही संस्थेवर घेताय, मी म्हणतो मला घेऊ नका, पण हे घेणारे कोण, सर्वसामान्यांची संस्था असणारी रयत आता पवार कुटुंबीयांची आहे काय, ज्यांच्या कुटुंबाची संख्या जास्त त्यांचेच नाव द्या, मग करा पवार शिक्षण संस्था, असेही उदयनराजे यांनी सांगितले.