पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. गेल्या 102 दिवसापासून संजय राऊत तुरुंगात होते. त्य़ामुळे त्यांना आज कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच आता राज्यातील राजकीय नेत्यांनी वाघाचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाघाचा फोटो ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मन: पुर्वक आभार आम्ही मानतो. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या सांभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे. असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील रोहित पवार यांनी देखील संजय राऊतांबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी वाघाला पिंजऱ्यातून बाहेर सोडतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे ते सांयकाळापर्यंत तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.