नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली आहे. परंतु या यात्रेकडे लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख आणि त्यांचे आमदार बंधू धीरज देशमुख हे अद्याप फिरकलेले नाहीत. देशमुख बंधू राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला फिरकले नसल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. कॉंग्रस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेची देशात चर्चा सुरू आहे.
या यात्रेत राज्यातीलचं नव्हे तर देशातील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होत आहेत. मात्र, नांदेडच्या शेजारीच असलेल्या लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, त्यांचे आमदार बंधू धीरज देशमुख हे अद्याप भारत जोडो यात्रेला जुडलेले नाहीत. यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा धम्म मेळावा झाला होता. या मेळाव्यात आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांना टोला लगावला होता.