शरद पवारांना धक्का देत आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र दुसरीकडे गोंधळलेल्या राष्ट्रवादीने पक्षातून कोणीही जाणार नसल्याचे सांगत भालके यांचे डिपॉजिट जप्त होईल असा दावा केला आहे .
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस चे सर्व आमदार , खासदार आणि मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत . यानंतर ते भालके यांच्या सरकोली येथील गावी सर्व ताफ्यासह जाणार असून त्यांच्या चार तासाच्या दौऱ्यातील तीन तास त्यांनी भालके यांच्यासाठी दिले आहेत अशी माहिती समोर येत आहे.
भालके याना मानणारा फार मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असल्याने त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत . के चंद्रशेखर राव सकाळी साडे दहा वाजता भालके यांच्या सरकोलीत पोचणार असून सुरुवातीला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
भालके यांनी आपल्या शेतात भला मोठा मंडप उभारला असून गाड्या पार्किंगसाठी दोन एकरावरील डाळिंबाची बाग मोकळी केली आहे. तेलंगणाच्या सर्व पाहुण्यांना भालके यांच्याकडून खास महाराष्ट्रीय बेत जेवणासाठी तयार केला असल्याने केसीआर हे भालके यांच्या निवासस्थानी भोजन करून दुपारी दीड वाजता तुळजापूर कडे प्रयाण करणार आहेत .
या पक्षप्रवेशावर बोलताना नव्याने पक्षप्रवेश केलेले उमेश पाटील यांनी भालके यांच्यावर निशाणा साधताना भगीरथ हे वडील आमदार असताना त्यांच्याच गावातून जिल्हा परिषदेला पराभूत झालेले आहेत . त्यांना पोटनिवडणुकीत पडलेली एक लाख पाच हजार मते राष्ट्रवादीची असल्याने ही मते आपल्या मागे असल्याचा भ्रम भालके यांनी करू नये असा टोला लगावला. भालके यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही पदाधिकारी अथवा नेता बीआरएस मध्ये जाणार नसून सर्व पदाधिकारी , नेते बैठकीत हजर असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला .