मुंबई | भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षावर आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात होत होत्या तसेच त्यांनी आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.
एकनाथ खडसे -पंकजा मुंडे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे यांना वारंवार भारतीय जनता पार्टीकडून डावलं जात आहे. मुंडे या पक्षावर नाराज आहेत. मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली होती.
तसेच कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आले. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी पक्षात यावं अशी माझी भावना आहे. पण त्याबाबत निर्णय पक्ष घेईल. बीआरएसने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मात्र बीआरएस पक्ष ही अफूची गोळी आहे. मला खात्री आहे की पंकजा मुंडे या त्या पक्षात जाणार नाहीत, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.