मुंबई | महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात पावसाने थैमान घातले होते. आता कुठे दोन दिवसांपूर्वी पावसाने जरा उसंत घेतली आहे. तोवर पुन्हा विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांत मागील आठवड्याच्या पावसामुळे पूरस्थिती आहे. आज अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपराजधानी नागपूरात महानगरपालिकांच्या बेजबाबदार नियोजनामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत येलोे अलर्ट आहे. तर वर्धा जिल्ह्यात फक्त आजपुरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना गुरूवारपासून पावसाची भीती नसल्याची दिलासादायक माहिती आहे. हवामान विभागाने गुरुवारपासून पावसाचे संकेत नसल्याचं सांगितलं.