Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रपतिपदासाठी २८३ आमदारांचे मतदान; चौघे मतदानापासून वंचित

0

 

राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी झालेल्या मतदानात राज्यातल्या एकूण २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. चार जण मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. भाजपचे लक्ष्मण जगताप आजारी असल्याने, माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात असल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना निवडणूक आयोगाने मतदानापासून रोखल्याने ते मतदान करू शकले नाहीत.

विधान भवनात सकाळी १० पासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वांत आधी माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत यांनी, तर सर्वांत शेवटी सपाचे आमदार अबू आझमी यांनी मतदान केले. नितीन राऊत यांनी आपल्या क्रमांकाच्या आधी मतदान केले. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने मतदान केल्याचा आक्षेप भाजपच्या बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे.

महेंद्र दळवी यांना मारहाणीच्या एका प्रकरणात तीन वर्षांपूर्वी अलिबागच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला दळवी यांनी वरच्या न्यायालयात आव्हान दिले असले तरी शिक्षा आधीच सुनावली गेली असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही असे पत्र दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानमंडळ सचिवालयाकडे पाठविले होते. आधी झालेल्या विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीत मात्र त्यांनी मतदान केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०० आमदार एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दावा केला, की हा आकडा दोनशे पार जाईल.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे एकही मत फुटणार नाही, सर्व मते यशवंत सिन्हा यांनाच मिळतील, असा विश्वास मतदानापूर्वी व्यक्त केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले, की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. आम्ही तो आदेश पाळत त्यांना मतदान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.