यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला. त्यामुळे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. मात्र, जुलै महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत तसेच त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे.
याच पार्श्वभूमीवर पेरणीला पोषक असा पाऊस नेमका कधी पडणार? याची वाट राज्यातील शेतकरी पाहत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील ३ दिवसात राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, गुरूवारी दिवसभरात मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी (Rain News) लावली. बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.