राज्यपालांच्या विधानावर जयंत पाटलांनी लगावला जोरदार टोला
परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन राहावे’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सुनावले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.
मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे’ असं म्हणत जयंत पाटलांनी राज्यपालांना टोला लगावला. ‘महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाला हे विधान मान्य आहे का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.
राज्यपाल मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली आणि जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत? असा खडा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते.याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे, असं म्हणत सुप्रीया सुळे यांनी निषेध व्यक्त केला.