राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत मराठी माणसाला डिवचलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.
मराठी माणसाला डिवचू नका! आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये असं म्हणत मनसेनं भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. या संदर्भातील एक पत्रक फेसबुकवर पसोट करून राज ठाकरेंनी थेट राज्यपालाला इशारा दिला आहे.
तसेच हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे, असं मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलं आहे. मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका, असं काळे यांनी म्हटलं आहे.