मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहेत. ते विविध कार्यक्रमात हजेरी लावत असतात. आपल्या भाषणातून तूफान फटकेबाजीही ते करतात. यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांनी मैदानावर तूफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मैदानावरील उत्साह पाहून खेळाडू यांच्यासह चाहत्यांचाही उत्साह वाढला. काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक २०२३’ या क्रिकेट स्पर्धेला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
यावेळी त्यांना तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी क्रिकेट खेळायला विनंती केली. त्यानंतर शिंदे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंगही केली. ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असते. यंदाच्या स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले आहेत. टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच, काल वेळात वेळ काढून एकनाथ शिंदे हे या स्पर्धेला हजर राहिले. त्यानंतर आज मुख्यमंत्री डाव्होस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
डाव्होस येथे जाण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. सध्या त्यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, यावेळी येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, टेंभी नाका बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, नितेश पाटोळे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.