एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केलं आहे. ‘राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे’, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पाठवलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.
गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. दरम्यान, आमदारांसोबतच आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ येताना दिसत आहेत.