रामदेव बाबांनी कोरोनाचे औषध विकसित केल्याचा दावा करत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, जसा अनेकांना यामुळे धक्का बसला तशाच काही जणांच्या भुवया देखील उंचावल्या. औषधाच्या निकषांवर, गुणवत्तेवर तसेच परवानग्यांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. ख्यातनाम साहित्यिक राजन खान यांनी देखील या प्रकरणावर आपला रोष व्यक्त केला आहे
रामदेव हा देशाचा बाप आहे. कोणतंही औषध लॉन्च करण्याआधी त्याच्या योग्य अथॉरिटीकडून परवानग्या, चाचण्या, तपासण्या, मान्यता त्याला घ्याव्या लागत नाहीत. अन्न आणि औषध प्रशासन असतं, त्याला हा माणूस हुंगत नाही. जग संकटात आहे, याचा हा माणूस धंदा करून घेतो. आणि हा इतका मोठा आहे की, आयुष मंत्रालय त्याला फक्त कोरोनाच्या औषधाचं मार्केटिंग करू नका म्हणून सांगतंय, त्याच्या औषधाला चॅलेंज करत नाही आणि त्याच्यावर दावा ठोकत नाही. (मुळात तो औषध लॉन्च करेपर्यंत आयुष मंत्रालय आणि योग्य अथॉरिटी जिवंत नव्हत्या का? त्यांना न विचारता औषध जाहीर करण्याची हिंमत कशी झाली याची?) आणि वैद्यकीय क्षेत्रातले जाणकारही याला आव्हान देत नाहीत. आयुर्वेदातले तज्ञही मूक राहतात. असे त्यांचे मत आहे.
अमाप इस्टेट आहे त्याची, पण सरकारनं त्याचं अडीच हजार कोटी कर्ज माफ केलं. आणि हा इतरांना देशप्रेम शिकवत फिरतो. ज्या रोगांना अजून औषधं सापडली नाहीत, त्या रोगांवर आपली औषधं जगाला वाचवतील असे दावे करणारा हा माणूस स्वतःवर वेळ आली की इलाज करून घ्यायला इंग्लंडला पळतो. हा माणूस निव्वळ फ्रॉड आहे. पण अशाच लोकांच्या बेबंद अनाचाराचा हा काळ आहे. गैरफायदा घेतायत हे लोक सगळ्या काळाचा. नैतिकता, अनैतिकता यांच्या खिजगणतीत नाही. फार वाईट वाटतं, यांच्या उघड फसवणुकी पाहून. देशाचं वाटोळं करतायत हे लोक. असा घणाघात खान यांनी केला
मुळात आयुर्वेदाच्या नावाखाली कुणीही उठून काहीही करतंय, यालाच आळा घालायची वेळ आलीय. फार मोकाट झालेत हे लोक. काहीच शिस्त उरलेली नाही. आयुर्वेदालाही काही कायदे, नियम असतीलच ना?अरे, थांबवा रे कुणी तरी यांना. देश, देशातली माणसं आणि देशाच्या कायद्यांपेक्षा नका मोठं होऊ देऊ यांना आणि यांच्या अवैध धंद्यांना. बास करा की यांचे मनमानी अनाचार. अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी आपला राग व्यक्त केलेला आहे.