महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही, असं वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.यावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला.. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे.. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.’ असे ट्विट राऊतांनी केले आहे.
हे ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा व्हिडिओही ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये राज्यपाल म्हणताना दिसतात, की ‘महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही.
मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही’राज्यपालांच्या या विधानावरुन आता राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.